एक नजर महाराष्ट्र न्यूज आजची सर्वात मोठी बातमी WhatsApp हॅक करून सेलिब्रिटी, राजकारणी यांची मोठी फसवणूक केली जात आहे. अभिनेत्री वनिता खरा, शिवसेना नेत्या शायना एनसी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. मुंबईत : सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स ॲप (WhatsApp) अकाऊंट हॅक होण्याच्या घटनांनी सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेत्या शायना एनसी आणि अभिनेत्री वनिता खरा यांच्या व्हॉट्स ॲप प्रकरणांची चौकशी सुरू आहे. या घटनांमागे उत्तर भारतात सक्रिय असलेल्या एका सायबर टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. फसवणुकीची सुरुवात
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या टोळीची कार्यपद्धती अत्यंत चलाख असल्याचं समोर येत आहे. सर्वप्रथम संबंधित व्यक्तीला कुरिअर किंवा पार्सलच्या नावाने फोन केला जातो. तुमच्या नावाने पार्सल आलं आहे, त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल किंवा पार्सलशी संबंधित अडचण आहे, अशा पद्धतीने संभाषण सुरू केलं जातं. यानंतर समोरच्या व्यक्तीला मोबाइलवर एक विशिष्ट कोड डायल करण्यास सांगितलं जात असल्याचा संशय आहे. हा कोट ’21’ ने सुरू होणाऱ्या कॉल-फॉरवर्डिंग सुविधेशी संबंधित असल्याचं तपासात समोर येत आहे. एका कोडनंतर कॉल दुसरीकडे वळवला जातो
संबंधित व्यक्तीने सांगितलेला कोड डायल केल्यानंतर त्यांच्या नंबरवर येणारे काही कॉल दुसऱ्या क्रमांकावर फॉरवर्ड होण्याची शक्यता असते. याच सुविधेचा गैरवापर करून व्हॉट्स ॲपच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यानंतर हॅकर्स व्हॉट्सॲप अकाऊंटचा ताबा मिळवण्यासाठी आवश्यक असलेला व्हेरिफिकेशन कोड किंवा कॉल मिळवण्याचा प्रयत्न करतात. एकदा अकाऊंटवर नियंत्रण मिळालं की खरी फसवणूक सुरू होते. अकाऊंट हॅक झाल्यानंतर कॉन्टॅक्ट्सच बनतात पुढचे लक्ष्य
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हॅकर्स केवळ एका व्यक्तीचं अकाऊंट ताब्यात घेऊन थांबत नाहीत. तर त्या व्यक्तीच्या व्हॉट्सॲपमधील कॉन्टॅक्ट्सच्या विश्वासाचा फायदा घेतला जातो. हॅक केलेल्या अकाऊंटवरून नातेवाई, मित्र, सहकारी किंवा ओळखीच्या व्यक्तींना मेसेज करून पैशांची गरज असल्याचं सांगितलं जातं. अशाप्रकारे एका अकाऊंटमधून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत फसवणुकीची साखळी निर्माण केली जाते.







Total Users : 254301