एक नजर महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:- शहाजी लक्ष्मण टिकुरे दौंड, पुणे | सप्टेंबर–ऑक्टोबर २०२६
समाजात लपून राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना वेळेत उपचारांच्या प्रवाहात आणण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दौंड तालुक्यात विशेष कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच, पूर्वी कुष्ठरोगावरील उपचार पूर्ण केलेल्या रुग्णांच्या सहवासितांची तपासणी करण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत दौंड तालुक्यातील ३७ जोखमीची गावे निवडण्यात आली आहेत. संबंधित आरोग्य संस्थांच्या निवडक भागांमध्ये आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य सेवक व सेविका यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन नागरिकांची शारीरिक तपासणी करण्यात येत आहे. संशयित कुष्ठरुग्ण आढळल्यास त्यांची पुढील तपासणी करून योग्य निदान व आवश्यक उपचारांसाठी आरोग्य संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव व त्यांच्या तालुकास्तरीय पथकातील तालुका कुष्ठरोग सहाय्यक श्रीमती स्नेहल बडेकर, श्री. दिलीप जगताप, श्री. आसिफ सय्यद व श्री. महावीर कांबळे यांनी नागरिकांना घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी तपासणी करून घेऊन कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास वेळेत निदान व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश कुष्ठरोगाचे लवकर निदान करणे, रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे आणि रोगाच्या प्रसाराची साखळी खंडित करणे हा आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून दौंड तालुका कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल होणार आहे.
ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे व सहाय्यक संचालक, कुष्ठरोग डॉ. जयश्री साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या प्रत्यक्ष कामकाजात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कांबळे, जिल्हा कुष्ठरोग समन्वयक श्री. दिनेश कुकडे, कुष्ठरोग सहाय्यक श्री. सांडभोर व श्री. भडलकर, तसेच भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. वर्षा आहेर यांनी सहभाग घेतला.
आरोग्य पथकास सहकार्य करा — कुष्ठरोगाचे लवकर निदान करा, नियमित उपचार घ्या आणि कुष्ठरोगमुक्त दौंड तालुक्याच्या निर्मितीत सहभागी व्हा!







Total Users : 256576