एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती : शहरातील प्रबुद्ध नगर, दादासो नगर, वडके नगर, प्रतिभा नगर, वडार गल्ली, इंदापूर रोड तसेच आमराई परिसरातील गटर लाईनची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने नागरिकांचे आरोग्य आणि दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी बारामती नगर परिषदेकडे निवेदन देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सदर भागातील जुनी गटर लाईन वारंवार तुंबत असल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही गटर लाईन सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी ठरत असून लहान व्यासाचे पाईप, कमी क्षमतेचे चेंबर आणि योग्य उताराचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मंगलदास निकाळजे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे या परिसराची तात्काळ तांत्रिक पाहणी करून जुनी गटर लाईन बदलण्याची, मोठ्या क्षमतेची नवीन पाईपलाईन टाकण्याची, चेंबरचे आधुनिकीकरण करण्याची तसेच संपूर्ण गटर व्यवस्थेची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
तसेच नवीन काम पूर्ण होईपर्यंत नियमित साफसफाईसाठी विशेष पथक नियुक्त करावे आणि पावसाळ्यात नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरणार नाही यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हा प्रश्न हजारो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने बारामती नगर परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मंगलदास निकाळजे यांनी व्यक्त केली आहे






