Wednesday, November 4, 2026
spot_img
spot_img

साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियम; अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

महाराष्ट्र न्यूज संपादक भीमसेन जाधव      बारामती, दि.२२: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामादरम्यान ऊस वाहतूक करताना होणारे अपघात रोखण्यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी बारामती येथे आयोजित बैठकीत दिल्या.

 

या बैठकीला बारामती कार्यक्षेत्रातील विविध साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, अनिल शेलार उपस्थित होते.

 

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत, तसेच वाहनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरू नये. वाहनाच्या पाठीमागील भागाला रिफ्लेक्टिव्ह टेप आणि रिफ्लेक्टिव्ह पट्टी लावून ती लाल रंगाची असावी. ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करताना वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.

 

ऊस वाहतूक बहुतांश वेळा रात्री होत असल्याने वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये. तसेच वाहनांमध्ये मोठ्या आवाजात स्पीकर लावू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. या सर्व नियमांची तपासणी संबंधित साखर कारखान्यांच्या एन्ट्री गेटवर करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. साखर कारखाना संचालक मंडळांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी रस्ता सुरक्षा, वाहतुकीदरम्यान घ्यावयाची काळजी आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रबोधनात्मक शिबिरांचे आयोजन करून मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्री. निकम यांनी केले.

 

सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिवहन विभागाने दिला.

या बैठकीस दौंड शुगर, भीमा शुगर, कर्मयोगी शुगर, बारामती ॲग्रो, सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव साखर कारखाना आणि छत्रपती साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

 

ऊस वाहतूक सुरक्षित, अपघातमुक्त आणि नियमबद्ध करण्यासाठी साखर कारखाने, वाहनचालक आणि परिवहन विभाग यांनी समन्वयाने काम करावे, असेही श्री. निकम यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या