पुणे : राज्यातील धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार स्विकारल्यापासून अवैध आणि भेसळयुक्त पदार्थांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरापासून एफडीएने राज्यभर कारवायांचा धडाका लावला असून तुकाराम मुंडेंच्या भितीने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. अशातच आता तुकाराम मुंडेंनी पुण्यामध्ये मोठी कारवाई करत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कँटिनचा परवाना रद्द केला आहे. पुणे विद्यापीठातील कँटिनचा परवाना रद्द
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’वर अन्न सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत त्यांचा अन्न व्यवसाय परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहात सुरू असलेल्या गैरव्यवहारांबाबत आणि स्वच्छतेच्या अभावाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली होती. या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या असून, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले आहे. भोजनगृहामध्ये अन्न शिजवण्याची आणि साठवण्याची प्रक्रिया अत्यंत असुरक्षित पद्धतीने केली जात होती. विशेषतः कच्चे आणि शिजवलेले अन्न एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे बंधनकारक असताना, तसे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले. तसेच, अन्न साठवणूक, त्याची हाताळणी आणि तापमानाचे नियंत्रण या महत्त्वाच्या प्रक्रियांत मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली आहे. या भोजनगृहातील अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
केवळ साठवणुकीतच नाही, तर संपूर्ण भोजनगृहाच्या परिसरातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. स्वच्छता राखण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशांचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अन्न सुरक्षा विभागाने कठोर भूमिका घेत परवाना निलंबित केला आहे. जोपर्यंत अन्न सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन होत नाही आणि स्वच्छतेच्या त्रुटी दूर केल्या जात नाहीत, तोपर्यंत हे भोजनगृह बंद राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे विद्यापीठ परिसरातील इतर कँटीनचालकांचेही धाबे दणाणले आहेत. रोज पहा. एक नजर महाराष्ट्र न्युज






