एक नजर महाराष्ट्र न्युज बारामती : बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला पुन्हा एकदा मोठी ताकद मिळाली असून सामाजिक कार्यकर्ते श्री. मंगलदास निकाळजे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश समारंभ मा. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी पक्षात मोठ्या संख्येने युवक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा सहभाग पाहायला मिळाला. प्रामाणिक आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे कार्यकर्ते पक्षात दाखल होत असल्याने बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
आदरणीय शरद पवार यांच्या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बारामतीत परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना श्री. मंगलदास निकाळजे म्हणाले की, “आज मी अत्यंत आनंदाने आणि पूर्ण विचारपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये अधिकृतपणे पक्षप्रवेश करत आहे. मा. युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मी सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर काम करत आलो आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, युवकांचे रोजगार, शिक्षण, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांसाठी सातत्याने लढण्याचे काम केले आहे. आता हीच लढाई अधिक ताकदीने आणि संघटित पद्धतीने पुढे नेण्यासाठी मी हा राजकीय निर्णय घेतला आहे.
मा. शरदचंद्र पवार साहेबांची शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि विकासाचा दृष्टिकोन मला नेहमी प्रेरणा देत आला आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार आहे.
विशेषतः बारामतीसह संपूर्ण परिसरातील युवक, शेतकरी, कामगार, बहुजन समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचे काम मी पुढेही सुरू ठेवणार आहे.”
कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. मंगलदास निकाळजे यांच्या पक्षप्रवेशामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






