सावधान! महाराष्ट्रात पुढील 72 तास धोक्याचे; हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना इशारा आजची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रासाठी पुणे महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून, तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात पुढील 72 तास धोक्याचे; हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना इशारा
मुख्य संपादक भीमसेन जाधव , पुणे
महाराष्ट्र सध्या सगळीकडे सूर्य आग ओकताना दिसत आहे. राज्याच्या विविध भागांत तापमानाने चाळीशी ओलांडली असून, पुढील 3 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, रखरखत्या उन्हातून सुटका मिळण्याची आशा असली तरी, 18 एप्रिलपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’?
राज्यात सध्या अकोला जिल्हा 44 अंश सेल्सिअस तापमानासह सर्वाधिक गरम नोंदवला गेला आहे. संपूर्ण विदर्भाला आजपासून पुढील दोन दिवस उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. अमरावती (43.8) आणि वर्धा (43.5) येथेही तापमान कमालीचं वाढलं आहे.
दक्षिण महाराष्ट्र व कोकण
सोलापूर, सांगली, कोकण आणि गोवा परिसरातही पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा जळगाव (42.5) आणि परभणी (42.1) मध्येही पारा चढलेलाच आहे.
18 एप्रिलपासून अवकाळीचा इशारा
उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. 18 एप्रिलपासून पुढे 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना
दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
पांढरे आणि सुती कपडे वापरा तसेच भरपूर पाणी प्या.
प्रवासात सोबत पाण्याची बाटली, छत्री आणि टोपी जवळ ठेवा.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.






