पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एकेकाळी विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे, आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपमधील काही घटकांमुळे गुंडांचे माहेरघर बनले असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. कोयता गँगसारख्या संकल्पना पुण्यातूनच बाहेर आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राऊत यांनी नाशिकमधील गुन्हेगारी नियंत्रणाच्या धोरणाचे कौतुक केले.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गुन्हेगारांवर कठोर कारवाई केल्याचे ते म्हणाले. कोणताही पक्ष किंवा संबंध न पाहता गुंडांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे हे धोरण प्रशंसनीय आहे. अशीच कारवाई ठाण्यात आणि विशेषतः पुण्यातही व्हावी, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. पुण्याची बदनामी होत असून, ही राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.






