एक नजर महाराष्ट्र न्यूज दौंड : पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले निखिल रणदिवे अखेर सुरक्षितरित्या सापडले आहेत. बुधवारी, 10 डिसेंबरच्या रात्री उशीरा ते शिक्रापूर येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःहून हजर झाले आहेत.
सुसाईड नोटमुळे खळबळ
निखिल रणदिवे बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे एक तक्रार अर्ज पाठवला होता. या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या गेल्या वर्षभराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत. निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यातून त्यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
निखिल रणदिवे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून चार स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. आता निखिल रणदिवे घरी सुरक्षित परतले असले तरी, पोलीस खात्याकडून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी याबाबत माहिती दिली.
पाच दिवस कुठे होते?
गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत निखिल रणदिवे नेमके कुठे होते आणि त्यांनी या दरम्यान काय-काय केले, याची चौकशी केली जाईल.या काळात निखिल यांच्या संपर्कात कोणकोण होते? याचाही तपास केला जाईल.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर केलेले गंभीर आरोप आणि त्यांच्या बेपत्ता होण्याचे मूळ कारण काय आहे, याचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांमुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा जपण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे अपेक्षित आहे.






