एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका पुढे ढकलण्याला अत्यंत चुकीचे म्हटले आहे. निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्या निवडणुका असताना आज त्या पुढे ढकलल्या जातात, हे अन्यायकारक असल्याचे फडणवीस म्हणाले. प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे हा निर्णय घेतला गेला, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात गेल्यास निवडणूक पोस्टपोन होईल, असे यापूर्वी कधीच घडले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
निवडणूक आयोग कोणत्या कायद्याचा आधार घेत आहे किंवा कोणाचा सल्ला घेत आहे, याची त्यांना कल्पना नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. अनेक वकिलांशी चर्चा केल्यानंतर, एखाद्या व्यक्ती कोर्टात गेल्याने निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, असे मत त्यांनी मांडले. उमेदवारांच्या श्रमाचे आणि मेहनतीचे नुकसान होत असून, त्यांना पुन्हा १५ ते २० दिवस प्रचार करावा लागेल, हे अतिशय चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले. यासंदर्भात निवडणूक आयोगाला एक निवेदन (रिप्रेझेंटेशन) देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






