एक नजर महाराष्ट्र न्युज मुंबई : स्टर प्रवाह वाहिनीवर नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्ण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने प्रामाणिक प्रयत्न केला. लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षक भेटीला घेऊन येणार आहे. साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी महिलांना चूल आणि मूल या बंधनात बंदिस्त केलेल्या समाज व्यवस्थेविरोधात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी एल्गार पुकारला. या दोघांनी मिळून केलेल्या संघर्षामुळे मुलींना शिक्षणाच्या गंगोत्री खुली झाल्याने खऱ्या अर्थानं शिकून सज्ञान होता आले. अत्यंत बिकट परिस्थितीत, प्रसंगी घरच्यांचा आणि समाजाचा दुहेरी रोष पत्करून त्यांनी काम केलं. अशा क्रांतिकारी दाम्पत्याचे त्या काळातील विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे, या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी ही मालिका प्रेक्षक भेटीला घेऊन येत आहेत. अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे जोतीबा फुले यांच्या भूमिकेत दिसतील. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी : मधुराणी गोखले
मधुराणी गोखलेने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं की, ‘सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.’






