एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्यसंपादक भीमसेन जाधव मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ८९ वर्षीय अभिनेते डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळजीकरण्यासारखं काही नसल्याचं म्हटलं जात आहे. नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सुत्रांनी सांगितलं. असं असलं तरी चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.धर्मेंद्रंच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र कुटुंबिय आणि डॉक्टरांच्या टीमक़ून त्यांची तब्येत स्थीर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचे चाहते त्यांच्या कुटुंबाकडून लवकरच चांगल्या बातमीची अपेक्षा करत आहेत. वयाची ऐंशी ओलांडली असली तरी धर्मेंद्र आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते सध्या ८९ वर्षांचे आहेत. डिसेंबर महिन्यात धर्मेंद्र त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत. धर्मेंद्र २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. बॉलिवूडचे ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र हे सहा दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीशी जोडले गेले आहेत.त्यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’ आणि ‘सत्यकाम’ सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तुम्ही लवकर बरे व्हा… धर्मेंद्र यांच्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर मेसेज लिहिले आहेत. “लवकर बरे व्हा धर्मेंद्रजी,” असं एका चाहत्याने लिहिलं आहे. “आमचे ‘ही-मॅन’ लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा,” असं दुसऱ्या चाहत्यानं म्हटलं आहे.
धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची विनोदी भूमिका असो वा गंभीर, त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला आहे. त्यांच्या अभिनयाची शैली आजही प्रेक्षकांना आवडते. धर्मेंद्र यांचा आगामी चित्रपट ‘इक्कीस’ या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.






