पुणे (प्रतिनिधी) — एक नजर महाराष्ट्र न्यूज संपादक भीमसेन जाधव
स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात भव्य “संवाद मेळावा” आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, जनसंपर्क आणि मतदार जोडणीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवून विजय मिळवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच, येणारी पदवीधर विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढवून जिंकण्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “वंचितांचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी थेट संवाद साधला पाहिजे. संघटनेची ताकद लोकांच्या विश्वासातूनच निर्माण होते.”
कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुके, ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद कांबळे, अनिताताई चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, पुणे शहर युवक अध्यक्ष सागर आल्हाट तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. संघटनेच्या पुढाकारातून पुणे विभागात नव्या राजकीय परिवर्तनाची दिशा ठरवणारा हा “संवाद मेळावा” ठरला.






