मुख्य संपादक एक नजर महाराष्ट्र न्यूज भीमसेन जाधव ता : इंदापूर .देशात लोकशाही आहे, असं आपण अभिमानाने म्हणतो. पण खरंतर आजची लोकशाही ही ‘लोकांनी निवडलेला लुटारूगिरीचा परवाना’ झाली आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी पक्ष बदलणं, विचारधारा गुंडाळून ठेवणं आणि जनतेच्या भावना विकणं हे रोजचं राजकारण झालंय.
जनतेचे प्रश्न — शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाचं बाजारीकरण, बेरोजगारी, महिलांच्या सुरक्षेची अधोगती — हे सगळं कुठे गेलं? चर्चा होते ती मंदिर-मशीद, जाती-पाती, पोस्टरबाजी आणि सोशल मीडियावरच्या ट्रेंड्सची. प्रश्न विचारणाऱ्याला ‘देशद्रोही’ ठरवून टाकायचं ही नवी ट्रेंड!
आणि आपण? आपण काय करतो? निवडणुकीत तांदूळ, साड्या, दारू, आणि खोट्या आश्वासनांनी विकले जातो. मतदानानंतर पुन्हा झोपतो. प्रश्न विचारायचा नाही, आंदोलने करायची नाहीत, आणि नंतर फेसबुकवर स्टेटस टाकायचा: “सगळेच सारखे आहेत!”
नेते बदलताहेत, पण नाती नाहीत – राजकारण आणि स्वार्थ यांची! कोण कुणाच्या हातात खेळतोय हे जनतेला दिसत नाही का? की आपण बघूनही दुर्लक्ष करतोय?
लोकशाही वाचवायची असेल, तर प्रश्न विचारणं सुरू करावं लागेल. झोपलेल्या समाजात क्रांती होत नाही. आता वेळ आली आहे – फक्त मत देऊन काम संपत नाही, आता हिशोब मागण्याची वेळ आली आहे
श्री युवराज म्हस्के सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश






