रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची आजची बातमी अकोला :शहरात निवडणुकांचे वातावरण शांत झाले असले तरी राजकीय हालचाली मात्र अधिकच वेगाने घडताना दिसत आहेत. अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर आता पक्षांतराच्या घडामोडींनी शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना उबाठा गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या घडामोडीमुळे उबाठा गटात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या बदलामुळे आगामी सत्तासमीकरणांवरही मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ४ नगरसेवकांचा प्रवेश.
महापालिका निवडणुकीत उबाठाच्या तिकिटावर विजयी झालेले मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने हा धक्का अधिक मोठा मानला जात आहे. मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती, त्यामुळे या पक्षांतराला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्तासमीकरणे बदलली, उबाठा गट कमकुवत
या पक्षांतरानंतर अकोल्यातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद लक्षणीय वाढली आहे. स्वीकृत नगरसेवकांसह एकूण सदस्यसंख्या आता 53 वर पोहोचली असून सत्ताधारी गट अधिक बळकट झाला आहे. संबंधित नगरसेवकांनी शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले असले तरी या घडामोडींमुळे उबाठा गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता या गटात केवळ 2 नगरसेवक उरले असून त्यांचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परिणामी, अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात आणखी पक्षांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






